पुरस्कारांची रक्कम थेट खात्यात – अमित देशमुख

मुंबई – कला क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करून कलावंतांचा यथोचित गौरव राज्य शासनातर्फे करण्यात येतो.

मात्र यावर्षी कोविड-19 या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आयोजनांवर आलेल्या बंधनांमुळे सांस्कृतिक कार्य विभागाला विविध पुरस्कार प्रदान सोहळे सध्या आयोजित करता येणे शक्‍य नसल्याने यावर्षीच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, दिवंगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ कलाकार गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

या सर्व मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, शासनाच्या नियमांचे पालन करून पुरस्कार प्रदान सोहळे आयोजित करता येतील आणि मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येऊ शकतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

Leave a Comment