पुणे | दुभाजक तोडल्यास व्यावसायिक परवाना रद्द

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक आणि पुणे- सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत व्यवसाय तसेच अतिक्रमणे सात दिवसांच्या आत काढून घ्या, अन्यथा कारवाई करू, तसेच सेवा मार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करताना त्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात येणार आहे, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिला आहे.

या तीनही महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या काही मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे एनएचएआयच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या विस्तारीकरण कामास अडथळे येत आहेत. या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात ३० मी. कायदेशीर हक्काचा मार्ग (राईट ऑफ वे) आहे त्या भागात मध्यापासून १५ मीटर तसेच ज्या भागात ६० मी. राईट ऑफ वे (आरओडब्ल्यू) आहे त्या भागात मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे पांडण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

महामार्गावरील व सेवा रस्त्यांवरील मार्ग दुभाजक अनधिकृतपणे तोडून येण्या-जाण्याकरीता मार्गिका तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासह त्यांचा व्यावसाय परवाना जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात येणार आहे. – संजय कदम, प्रकल्प संचालक