पुणे | पाणीकपातीचे संकट लांबणीवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पुढील काही महिन्यांत पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातील पाण्याचा आढावा शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कपातीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

धरणात असलेले पाणी महापालिकेसाठी जुलैअखेरपर्यंत राखीव ठेवण्यात आले असल्याने तूर्तास गरज नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने शहरावर असलेले पाणीकपातीचे संकट टळले आहे. महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी बैठक बोलावली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पाटबंधारे विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

धरणातील साठा पुरेसा?
या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ६.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली, तसेच पालखीसाठी अर्धा टीएमसी आणि १५ जुलैपर्यंत महापालिकेस आणखी साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. शेतीसाठी उन्हाळी आर्वतनाची मागणी असली, तरी नुकतेच शेतीसाठी देण्यात आलेले आवर्तन जादा दिवस दिल्याने तूर्तास शेतीसाठी पाण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.

त्यानुसार महापालिकेकडून सध्या असलेले पाणी पुरेसे असल्याने, तसेच शहरात एक दिवस पाणी बंद केल्यास पुढे तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होतो. त्यामुळे आणखी दोन आठवडे कपात न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या वेळी हवामान विभागाकडून मान्सून लवकर येण्याचे, तसेच चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून त्यावरही चर्चा करण्यात आली.

महापालिकेकडून नियोजनाची तयारी
पुणेकरांवरील पाणीकपात टळली असली, तरी महापालिकेने मात्र शहरातील पाणीकपातीच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत शहरात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयानंतरच धरणात पाणी वाढण्यास सुरुवात होते.

त्यामुळे जूनमध्ये मोठया प्रमाणात कपात करावी लागते. त्यामुळे यंदा पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेकडून नियोजन तयार करण्यात आले असून, पुढील काही गुरुवारी तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवले जाणार आहे. त्याचा प्रस्तावही आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.