ईडीने जप्त केलेली प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता मिळणार परत

मुंबई  – पुर्वी शरद पवारांबरोबर असलेले परंतु आता अजित पवार यांच्या मार्फत भाजपबरोबर असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांची ईडीने जप्त केलेली १८० कोटी रूपयांची मालमत्ता आता त्यांना परत मिळणार आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे नमूद करीत ती जप्ती संबंधीत न्यायाधिकरणाने उठवली आहे.

ही मालमत्ता वरळी येथील सीजे हाऊस या इमारतीत आहे. या इमारतीतील चार मजले पटेल यांनी विकत घेतले असून ती एकूण जागा सुमारे चौदा हजार चौरस फूट इतकी आहे. पटेल यांनी ती बॉम्ब स्फोटातला आरोपी इक्बाल मिर्ची याच्याकडून विकत घेतल्याने ईडीने त्यावर कारवाई करून ती ताब्यात घेतली होती.

इक्बाल मिर्ची हा दाऊदचासहकारी आहे आणि तो १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सन २०१३ मध्ये तो लंडन येथे मरण पावला. त्याची पत्नी हजरा मेमन यांच्याकडून ती जागा पटेल यांनी विकत घेतली हेाती. त्यामुळे या मालमत्तेशी इक्बाल मिर्चीचा काहीच संबंध नाही असे नमूद करीत ईडीच्या न्यायाधिकरणाने त्यांची ही जप्त मालमत्ता आता मोकळी केली आहे.

पण या अनुषंगाने आता विरोधकांना टीका करण्यास आयताच विषय मिळाला असून ही भाजपच्या वॉशिंग मशिनची किमया आहे असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार गटाच्यावतीने केंद्रात मंत्रिपद मिळू शकते त्यामुळे त्या आधी त्यांच्यावरचा हा डाग भाजपच्या वॉशिंग मशिन मधून धऊन काढला गेल्याचा आरोपही विरोधीपक्षांकडून केला जात आहे.