पुणे | तीन क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीचा प्रस्ताव

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) राज्यातील महाविद्यालयांच्या माध्यमातून तीन क्लस्टर विद्यापीठांमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया आगामी कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

फर्गसन आणि बीएमसीसी या दोन महाविद्यालयांच्या माध्यमातून एक क्लस्टर विद्यापीठ तयार करण्यास शासनाने परवानगी दिल्यास पुढील शैक्षणिक वर्षात हे क्लस्टर विद्यापीठ कार्यान्वित होणार आहे.

डीईएस व्यवस्थापनाच्या वतीने पुण्यात फर्गसन आणि बीएमसीसी ही महाविद्यालये चालविली जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि किफायतशीर शुल्क यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागते. या विद्यार्थ्यांना डीईएस व्यवस्थापनाने शिक्षणासाठी डीईएस पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

डीईएसचे व्यवस्थापन, अनुभवी प्राध्यापक, पायाभूत सुविधांची उपलब्धता यामुळे गुणवत्तापूर्ण व किफायतशीर शिक्षण देता येईल. भारतीय ज्ञान परंपरा, पर्यावरण आणि तंत्रज्ञान हा विद्यापीठाचा पाया असून, संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डीईएसचे उपाध्यक्ष अॉड. अशोक पलांडे, कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, प्रा. आशिष पुराणिक आदी उपस्थित होते.

डीईएस पुणे विद्यापीठाने इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी, सायन्स व मॅथेमॅटिक्स, ह्युमॅनिटीज व सोशल सायन्स, डिझाईन व आर्टस आणि कॉमर्स व मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिल्म मेकिंग, इंटेरियर डिझायनिंग व यूजर एक्सपीरियन्स, ड्रामॅटिक्स, अॉनिमेशन, बीबीए, एमबीए बीबीए आयबी, पीजीडीबीडीए, पीजीडीबीएफ, पीजीडीटी या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २२०० प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत.

डीईएसचे सांगली आणि मुंबईतही शैक्षणिक संकुल आहेत. यांच्या माध्यमातूनही दोन स्वतंत्र क्लस्टर विद्यापीठांची निर्मिती होऊ शकते. या कॉलेजांचे विद्यापीठ करण्याचा निर्णय भविष्यात करण्यात येईल, असे डॉ. रवींद्र आचार्य यांनी सांगितले.

संशोधनासाठी १३ कोटी ५० लाख अनुदान
शासनाकडून फर्गसन महाविद्यालयाला ‘लाइफ सायन्सेस’ अंतर्गत संशोधन प्रकल्पासाठी १३ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. आगामी काळात या अनुदानाच्या माध्यमातून स्वतंत्र ‘लाइफ सायन्सेस सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण विभागाकडून ‘इंडियन नॉलेज सिस्टीम रिसर्च सेंटर’ स्थापन करण्यासाठी अनुदान मिळणार आहे.