2 लाख रुपयांची लाच घेऊन पैसे गाडीच्या डिक्कीत ठेवताना पीएसआयला अटक

वर्धा – आरोपीची बेल रद्द न होण्याकरिता, मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकास अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर असे अटक केलेल्यांचे नाव आहे. लोणकर हा वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी केली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वर्धा येथील हिंगणघाट पोलिस ठाण्यात एक 44 लाख रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. रक्कम मोठी असल्याने हे प्रकरण पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. तर याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लोणकर यांच्याकडे होता.

या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला होता. तक्रारदार तारखेलाही हजर राहत होते. मात्र फसवणूक प्रकरणातील आरोपीला दाखल गुन्ह्यात त्याच्या पत्नीला आरोपी न बनविण्यासाठी तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी तसेच जामीन रद्द न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेसाठी लोणकरकडून मानसिक दबाव निर्माण केला जात होता.

दरम्यान, तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून पोलिस अधीक्षक माखणीकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबी पोलिसांनी वर्ध्यातील आरती चौकात सापळा रचला. तक्रारदाराने पोलीस निरीक्षक लोणकरला फोन करुन बोलाविले नर्सरीसमोर बोलावले.

लोणकर हा दुचाकीने नर्सरीच्या प्रवेशद्वाराजवळ आला. तेथून त्याने झाडे विकत घेतली. तेवढ्यातच तक्रारदाराकडून लोणकरने दोन लाख रुपये घेतले आणि ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असतानाच त्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तसेच कोणताही सरकारी अधिकारी काही कामासाठी लाच मागत असल्यास जवळील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन एसीबी पोलीसांनी केले आहे.