भाजपात जाण्याचा जनतेचा आग्रह

इंदापुरातील जनसंकल्प मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांची माहिती

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील जनतेच्या भावनेचा अंदाज घेतला आहे. राजकीय हवा ज्या दिशेने चालली आहे तो निर्णय घेण्याचा भाजपात जाण्याचा जनतेचा आग्रह आहे, याच भावनांची कदर करून, येत्या दहा तारखेपर्यंत राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याची घोषणा राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासो डोंबाळे होते. इंदापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष कृष्णाजी यादव, निरा भिमाचे चेअरमन लालासो पवार, कर्मयोगीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, तालुकाध्यक्षा शालिनी भोंग, सभापती करणसिंह घोलप, माजी सभापती विलासराव वाघमोडे, नंदकुमार सोनवणे, रमेश जाधव, जि.प.सदस्या अंकिता पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, उदयसिंह पाटील, विकास पाटील, रघुनाथ राऊत, प्रशांत पाटील, युवक नेते दीपक जाधव, शेखर पाटील, श्रीमंत ढोले यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री पाटील म्हणाले की, राजकारण 25 वर्षांपासून करीत आहे. परंतु, आजच्या जनसंकल्प मेळाव्यातील गर्दीचा करंट फार वेगळा आहे. आमच्या रक्‍तातच स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आहे, याचा गैरफायदा मित्र पक्षाने कित्येक वर्षापासून घेतलेला आहे. स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील यांनाही यांनी त्रास दिला, अजित पवार यांची गुणवत्ता नसताना देखील त्यांना लोकसभेला स्वर्गीय भाऊ यांचे तिकीट कापून संधी दिली गेली. त्या काळात देखील 84 हजारांचे मताधिक्‍क्‍य आम्ही अजित पवार यांना दिले. मात्र, हे नियतीला मान्य नसल्यामुळे दिल्लीत गेलेले अजित पवार 11 महिन्यांत गल्लीत आले, अशी राजकीय खिल्ली हर्षवर्धन पाटील यांनी खुलेआम उडवली.

पाटील म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती असल्यापासून मला सातत्याने राजकीय त्रास देण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस करते आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला दिलेला शब्द पाळून मंत्रिपद दिले. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला शब्द पाळू मला मंत्रिपदापर्यंत पोहचवले तसेच

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे शब्दाला पक्के असल्यामुळे तालुक्‍याच्या विकासासाठी मंत्री पदाच्या खुर्चीवर मला बसवले. मात्र, यांच सगळं वेगळंच आहे. कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्यासमोर नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी 2019च्या विधानसभेसाठी कॉंग्रेसला इंदापूरची जागा देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती, असे असताना त्यांनी शब्द पाळला नाही. इंदापूर तालुक्‍यात आयोजित कार्यक्रमात शिवस्वराज्य यात्रा नव्हती तरीही येथे सभा घेतली. हे उघड उघड पाप माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आरपारची लढाई करण्याची माझी तयारी आहे. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे,नंदकुमार सोनवणे, सभापती करणसिंह घोलप कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले,अँड.कृष्णाजी यादव युवक नेते दीपक जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत मनोगत व्यक्‍त केले.

विजयदादा म्हणाले की…
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी जाऊन निर्णय घेतोय, असे दादांना सांगितले. यावर मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत का भाजपमध्ये आला नाहीत, असे म्हणून माझ्या या निर्णयाचे स्वागत केले. माझ्यावर जो अन्याय झाला आहे, याचे साक्षीदार मोहिते-पाटील आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतात दिली.

Leave a Comment