स्कूटरवरून फटाके घेऊन घरी जाताना भीषण ‘स्फोट’; पिता-पुत्राचा मृत्यू

पुद्दुचेरी – स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना स्फोट होऊन या घटनेत वडिल आणि मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुद्दुचेरीमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरी येथील रहिवासी कालाई अरसन त्यांच्या 7 वर्षीय मुलगा प्रदीपसोबत फटाके घेऊन स्कूटरवरून घरी परतत होते. त्याचवेळी अचानक फटाक्यांमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरदार होता की त्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला. तसेच रस्त्यावरून जाणारे अन्य 3 जण जखमी झाले. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरीमध्ये काही देशी फटाके बेकायदेशीरपणे बनवून विकले जातात. कलई अरसन आपल्या स्कूटरवर जे फटाके घेऊन जात होते ते असेच देशी फटाके होते. या फटाक्यांमध्ये अधिक आवाजासाठी बारूद अतिशय घट्ट भरले जाते. त्यामुळे स्कूटरच्या पुढच्या भागात ठेवल्याने त्यामध्ये ठिणगी पडली असावी, त्यामुळे त्याचा स्फोट झाला.

घटनेनंतर विल्लुपुरम जिल्ह्याचे डीआयजी पांडियन यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. या घटनेत जखमी झालेल्या तीन जणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना कालाई अरसन आणि त्यांचा मुलगा प्रदीप यांना वाचवता आले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.