Pune: 14 वर्षाचा मुलगा चालवत होता i20 कार, 7 वाहनांना दिली धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे – धनकवडी परिसरात शुक्रवारी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या कारने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र परिसरात मोठा गोंधळ माजला होता. नागरिकांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या साथीदारास पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गाडी मालक (i20 कार) विनय जर्नादन नायर (वय 25) हे बालाजीनगर येथे काम करतात. त्यांच्याकडे एक 19 वर्षाचा तरुण शिक्षक म्हणून काम करतो. या तरुणाच्या भावाने (वय 14) नायर यांची कार घेतली, सोबत त्याचा वर्गमित्राला घेतले.

यानंतर दोघे भारती विद्यापीठ मागील आंबेगाव पठार येथून कार घेऊन निघाले. त्यांच्या कारची एका वाहनाला धडक बसली. यामुळे तो वाहन चालक त्यांच्या मागे लागला. याप्रकरणामुळे घाबरुण अल्पवयीन चालकाने भारती विद्यापीठ, धनकवडी आणि बालाजीनगर असे कार घेऊन पळू लागले. मात्र त्यांना कारवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्यांनी रस्त्यातील सात ते आठ वहानांना ठोकरले. यामध्ये रिक्षामध्ये असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हाताला लागले तर पायी जाणारे दोघे बालंबाल बचावले.

या प्रकारामुळे काही वाहनचालकांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना बालाजीनगर येथे गाठले. त्यांची गाडी अडवून त्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांच्याही पालकांना आणि वाहन मालकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.