पुणे : सात-बारा उताऱ्यावरील 7 हजार नोंदी प्रलंबित

पुणे – जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील 7 हजार 155 इतक्‍या नोंदी प्रलंबित आहेत. या नोंदी निकाली काढण्यासाठी येत्या बुधवारी (दि.9) मंडलस्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडल स्तरावर आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील महिन्यात झालेल्या अदालतीमध्ये 3 हजार 554 इतक्‍या नोंदी निकाली काढण्यात आल्या.

जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या नोंदीमध्ये प्रामुख्याने वारस, तक्रार, व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निकाली काढण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निकाली करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालती मध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडल स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत. नागरिकांनी मंडल कार्यालयात आवश्‍यक ती कागदपत्रांसह नोंदी निर्गत करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.