पुणे : सोसायटीच्या मेन्टेनन्सवरून टोळक्‍याचा तुफान राडा

भारती विद्यापीठ परिसरात पाच कार फोडल्या

पुणे – सोसायटीच्या देखभाल शुल्कावरून वाद झाल्याने एकाने 14 जणांच्या टोळक्‍यास बोलावून सोसायटी बाहेर लावलेल्या वाहनांची तुफान तोडफोड केली. यानंतर कोयते फिरवत परिसरात दहशत पसरवून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह 12 जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पृथ्वीराज महेंद्र भोसले (27,रा.स्वामी सदन सोसायटी, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तुषार मधुकर डिंबळे (23,रा.आंबेगाव पठार), निखिल सखाराम आखाडे (26, रा.धनकवडी), आकाश बापू म्हस्के (24), अविनाश रामदास महामुनी (29), अजिंक्‍य संतोष काळे(20) यश प्रशांतसिंग साहुत (21), दीपक किसन तोरमकर (23), अमोल ज्योतीबा कांबळे (25,सर्व रा.आंबेगाव पठार) व विशाल विष्णू कांबळे (24,रा. कात्रज) अशी आरोपींची नावे आहेत. यातील डिंबळे याच्या आईकडून सोसायटीने दहा हजारांचे देखभाल शुल्क घेतले होते. ते का घेतले, या कारणावरून ही भांडणे झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संग्राम लेकावळे व तुषार डिंबळे यांच्यामध्ये सोसायटीच्या देखभाल शुल्कावरून शुक्रवारी भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून तुषार डिंबळेने रोहित देशमुख व अमोल कांबळे यांना बोलावून घेतले. या दोघांना संग्राम लेकावळे व त्याच्या सोबतच्या मुलांनी मारहाण केली. ही मुले नवयुग चौकातील असल्याची माहिती तुषारला मिळाली, त्यानुसार तुषारने शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास वरील गुन्हा दाखल झालेल्या 11 जणांना बोलावून घेतले. हे सर्व जण दुचाकीवरून कोयते घेत परिसरात दाखल झाले. त्यांनी दहशत पसरवत दुकाने बंद करण्यास
भाग पाडले.

यानंतर परिसरातील सेन्ट्रो, वॅगन आर, मारुती कार, रेनॉल्ड डस्टर, स्वीफ्ट डिझायर या गाड्यांची तोडफोड करुन 70 हजाराचे नुकसान केले. यामुळे काही काळ परिसरात तणाव पसरला होता. घटनास्थळी तातडीने सहायक पोलीस आयुक्‍त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार व ए.आर.कवठेकर यांनी भेट दिली.

Leave a Comment