Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रवानगी

Pune Porsche Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला असून अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. याउलट त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. 14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.

बाल हक्क न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता वेदांतला सुरक्षेच्या कारणास्तव बाल सुधारणगृहात म्हणजेच बाल निरीक्षणगृह येथे ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली तेव्हा पोलिसांनी अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद केला. वेदांत अल्पवयीन असला तरी तो नशेच्या आहारी गेला आहे. त्यामुळे त्याच्यापासून इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. त्यामुळे बाल हक्क न्यायालयाने वेदांतला निरीक्षणगृहात ठेवण्याचा निकाल दिला.

बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं. त्यावेळी युक्तीवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारु प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचे बीलही कोर्टासमोर सादर केलं. तर तिकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायलायनं आदेश दिला.

हा मुलगा अल्पवयीन असल्याचं आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला. तर या आरोपीने केलेलं कृत्य हे अत्यंत भीषण असं आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं करण्यात आली.