Pune : शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे – पुणे विभागातील विविध ठिकाणच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

मोशी येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या वसतिगृहात इयत्ता ११ वी व पुढील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत.

या वसतिगृहात विद्यार्थ्यांची ठराविक क्षमता असून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

वसतिगृहाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सूरू असून दहावी, बारावी व इतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून प्रवेश अर्ज वाटप वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये सुरू होत आहे.

सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात इयत्ता ७ वी नंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियंता पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत.

वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेवर राहणार आहे. खेड तालुक्यातील चांडोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर येथील शासकीय वसतिगृहासाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.