Pune: धोक्याची घंटा… पाण्याचा निचराच नाही; ३५ कोटी रु. पाण्यात

पुणे – गेल्या काही वर्षांत शहरात वारंवार पावसाचे पाणी साचत आहे. त्यावर महापालिकेने मागील वर्षी १२७ ठिकाणी पावसाळी कामे केली होती. या शिवाय १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर नाले सफाईसाठी प्रत्येकी एक ते दीड कोटींची पावसाळापूर्व कामे करण्यात आली. तर सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून चेंबर सफाई केली. तसेच कर्ल्वट बांधणे, नवीन पावसाळी लाइन टाकणे अशी सुमारे सात कोटींची कामे करण्यात आली.

मात्र, त्यानंतरही आता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा खर्च पाण्यात गेला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळी वाहिन्या एका तासात ३५ ते ५० मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करू शकतात. त्यातही त्यांची सफाई न झाल्याने या वाहिन्या २५ ते ३० मिमी पावसाने ओव्हर फ्लो होतात. गेल्या काही वर्षांत शहरात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाण्याचा निचराच होत नसल्याने पुणे शहर सातत्याने पाण्याखाली जात असून, ही धोक्याची घंटा आहे.