PUNE : ललित पाटीलचा आणखी एक आश्रयदाता अटकेत

पुणे- अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण देवकाते यास गुन्हे शाखेने अटक केली. ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील डाॅ. संजय मरसाळे यास गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली होती. त्यानंतर डाॅ. देवकातेला अटक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

डॉ. देवकाते हा ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट आहे. ललित पाटीलला ऑर्थोपेडिक्स संदर्भातील कोणतेही दुखणे नसताना, तो तब्बल दोन महिने डॉ. देवकाते याच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. तसेच डॉ. देवकाते हे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि मित्र अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.याप्रकरणी डाॅ. देवकाते याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणात ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक करण्यात आली. तपासात डाॅ. मरसाळे यांनी ललितला ससूनमध्ये दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डाॅ. मरसाळे याने ललितकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यास सोमवारी अटक करण्यात आली. तर, दुसरीकडे डॉ. देवकाते याच्याविरुद्धही सबळ पुरावे मिळाल्याने अटक करण्यात आली.

मोठे डॉक्टर रडारवर

ललित पाटीलला आश्रय आणि ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील आणखी काही बडे डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. पुढील आठडाभरात आणखी काही डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.