PUNE: प्रदूषणामुळे शहरी मुलांमध्ये वाढतेय दम्याचे प्रमाण

पुणे –  जगातील अनेक शहरे हवा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहेत. यामुळे शहरी मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भविष्‌यात हवेची गुणवत्ता सुधारली नाही, तर मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढू शकते, असा इशारा द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मॅगझिनद्वारे देण्यात आला आहे.

हवेतील धूर आणि धुळीचे सूक्ष्म कण हे मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रामुख्याने विकसनशिल शहरी भागात राहणाऱ्या मुलांमध्ये याचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासात 6-17 वर्षे वयोगटातील 208 मुलांचा समावेश होता, ज्यांना दम्याचा त्रास होता. सर्व प्रकारच्या प्रदूषकांचा मुलांच्या श्वसनमार्गावर परिणाम होतो, त्यामुळे दम्याचा धोका वाढतो, असे अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी या अहवालात म्हटले आहे.

प्रदूषणामुळे मुलांच्या श्वसनमार्गाला सूज येत आहे. त्याच्या सभोवतालचे स्नायू आकुंचन पावतात आणि ते लवकर कफाने भरतात. यामुळे पुरेशी हवा श्वसनमार्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. यामुळेच मुलांमध्ये दम्याचे रुग्ण वाढत आहेत. हा अभ्यास नऊ कमी उत्पन्न असलेल्या शहरांतील मुलांवर करण्यात आला आहे. टीमने दैनंदिन हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले आणि शहरी मुलांमधील दम्याच्या रुग्णांशी तुलना केली.

भारतातील स्थितीबाबत नोंदीच नाहीत

विविध अभ्यासांनुसार, भारतातील मुलांमध्ये बालरोग दमा सर्वात सामान्य आजार मानला जातो. सरासरी 7.9 टक्के मुलांना त्याचा त्रास होतो. पालकांमध्ये जागरुकतेच्या अभावामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. तथापि, दम्याने ग्रस्त बालकांच्या संख्येबाबत कोणतीही सरकारी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

मुलांना दमा होण्याची कारणे…
– हवेतील विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करतात, जे दम्याचे प्रमुख कारण आहे.
– परिसरातील इतर लोक सिगारेट ओढतात, तेव्हा निघणारा धूर हेदेखील एक कारण आहे
– हा आजार आनुवंशिक देखील असू शकतो
– अॅन्टी बाययोटिक्स औषधांचा अतिवापर

लक्षणे
– श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज
– श्वास, धाप लागणे
– छातीत जडपणा जाणवणे
– खोकला येणे

ग्रामीण भागातील मुले निरोगी

शहरी भागातील मुलांमध्ये दम्याचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेषत: ग्रामीण भाागात राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत हे प्रमाण दोन ते तीन पट जास्त आहे. ग्रामीण भागातील मुले निरोगी असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.