पुणे – पावसाळापूर्व कामे मार्गी लागणार

पुणे – निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेली पावसाळापूर्व कामे मार्गी लागणार आहेत. ही कामे करण्यासंदर्भात महापालिकेने निवडणूक आयोगाकडे विनंती करणारे पत्र पाठविले आहे. त्यावर आयोगाकडून काही लेखी उत्तर आलेले नसले तरी ही कामे अत्यावश्‍यक बाब असल्याने आयुक्‍तांच्या अधिकारात येणारी कामे तातडीने मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात गेल्या काही वर्षांत पावसाळापूर्व कामे जाणून बुजून उशीरा केली जात असल्याचे चित्र आहे. त्यात प्रामुख्याने दरवर्षी नाले सफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गाळ कागदावरच काढला जातो. तर ड्रेनेज सफाई पावसाळा सुरू झाल्यानंतर केली जाते. विशेष म्हणजे ही कामे मार्च ते मे या महिन्यांत होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाल्यानंतर या निविदा काढल्या जातात. तसेच, त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली जाते. त्यासाठी महापालिकेचे डीएसआर (डीस्ट्रीक्‍ट शेड्युल रेट) ठरले नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र, हे प्रकार टाळण्यासाठी महापालिका आयुक्‍तांनी या कामांच्या निविदा लोकसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या होत्या. त्यानुसार, त्या मार्च महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र, केवळ सहाच क्षेत्रीय कार्यालयांनी या निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर अद्यापही 9 क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा मान्यतेतच लटकलेल्या आहेत. त्यातच आता निवडणूक आचारसंहिता कालावधी असल्याने त्या काढणे शक्‍य नसल्याने राज्यातील निवडणुकांचा टप्पा 29 एप्रिल रोजी संपल्यानंतरच मे महिन्यात या निविदा काढल्या जातील असे अपेक्षीत होते. मात्र, ही आचारसंहिता शिथील होण्याची चिन्हे नाहीत. त्याचवेळी ही कामे पूर्ण होणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेता, आचारसंहिता भंग न होता, अत्यावश्‍यक बाब म्हणून आयुक्‍तांच्या अधिकारात जी पावसाळापूर्व कामे करणे शक्‍य आहेत, ती तातडीने हाती घेतली जाणार आहेत. त्यात नाले सफाई, ड्रेनेज सफाई तसेच इतर अनुषंगिक कामांचा समावेश असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Comment