Pune Bribe: महावितरणच्या सहाय्यक अभियंताला 50 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले

पुणे  – पूर्ण झालेल्या कामाचा दाखला देण्यासाठी ठेकेदाराकडून 50 हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. रवींद्र नानासाहेब कानडे (37) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आर. एम. सी. प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठयाचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजनेच्या 1.3 टक्के तत्वाच्या नियमानुसार पूर्ण केले होते.

या कामाच्या पूर्णत्वाचा दाखल देण्यासाठी कानडे यांनी 50 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत तक्रार दिल्यानंतर बाणेर येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात सापळा लावून सहाय्यक अभियंता कानडे यांना 50 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.

कानडे यांच्यावर चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. शासकीय अधिकारी, कर्मचाजयांनी लाच मागितल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.