Pune: सीबीएसईचे पुरवणी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावरुन वेळापत्रक डाऊनलोड करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सीबीएसईने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्‍या सर्व विषयांच्या परीक्षा 15 जुलै 2024 रोजी फक्त एकाच दिवशी घेतल्या जातील. इयत्ता बारावीची परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत विषयनिहाय घेण्यात येणार आहे.

दहावीची परीक्षा 15 ते 22 जुलै असे सहा दिवस असणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठीची वेळ सकाळी 10:30 ते 12:30 आणि सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत विषयनिहाय घेण्यात येणार आहे. दरम्यान, यावर्षी दहावीच्या 1 लाख 32 हजार आणि बारावीच्या 1 लाख 22 हजार विद्यार्थी पुरणवी परीक्षेसाठी पात्र आहेत. परीक्षेला बसण्यासाठी हे विद्यार्थी १५ जूनपर्यंत सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात, असेही बोर्डाकडून स्‍पष्ट करण्यात आले आहे.