PUNE: फुल बाजारातही उत्सव; श्रीराम सोहळ्यामुळे मागणी

पुणे – श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मंदिर सजावट, तसेच घरगुती ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढल्याने फुले महागली आहेत. सध्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीप्रमाणे फुलांना मागणी असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील फूल व्यापारी सागर भाेसले यांनी सांगितले.

मार्गशीर्ष महिन्यात लग्नसराई, तसेच दर गुरुवारी महिलांकडून श्री महालक्ष्मी व्रत केले जात असल्याने फुलांच्या मागणीत वाढ होते. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्यात फुलांना फारशी मागणी नसते. गेल्या आठवड्यात फुलांना फारशी मागणी नसल्याने फुलांचे दर कमी होते.

शनिवारपासून (२० जानेवारी) फुलांच्या मागणीत वाढ सुरू झाली. शनिवारी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजार बंद असल्याने आवक झाली नव्हती. रविवारी (२१ जानेवारी) फुलांची मोठी आवक झाली. सकाळपासून बाजारात किरकोळ बाजारातील फूल व्यापारी, सजावटकार, तसेच घरगुती ग्राहकांकडून फुलांना मागणी होती. मागणी वाढल्याने फुलांच्या दरात मोठी वाढ झाली, असे भोसले यांनी सांगितले.

मंदिर सजावटीसाठी केशरी झेंडूच्या मागणीत वाढ झाली. घाऊक बाजारात एक किलो केशरी झेंडूचे दर ८० ते १३० रुपये होते. केशरी झेंडूसह पिवळा झेंडू, गुलछडी, अष्टर, डच गुलाब, शेवंती, जरबेरा या फुलांना मागणी वाढली होती. मंदिर सजावटीसाठी झेंडू, डच गुलाब, डेझी, कामिनी, जरबेरा या फुलांना मागणी होती. फुले खरेदीसाठी मंडईतील हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात खरेदीसाठी गर्दी झाली होती. भगवे ध्वज, पताका, सजावट साहित्य खरेदीसाठी रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात गर्दी झाल्याचे दिसून आले.

फुलांचे एक किलोचे भाव

केशरी झेंडू (मोठा)- ८० ते १२० रुपये
पिवळा झेंडू- ६० ते ८० रुपये
ॅस्टर- १०० ते १५० रुपये
डच गुलाब- १०० ते २५० रुपये (२५ काड्या)
शेवंती- १०० ते १५० रुपये
जरबेरा- ३० ते ६० रुपये

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाली. फुलांची आवक चांगली झाली असून, फुलांना दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुणे, सोलापूर, सातारा परिसरातून फुलांची आवक झाली, असे फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.