पुणे – मार्केटयार्डात होणार आंब्यांची तपासणी

कॅल्शियअम कार्बाईड वापर टाळण्याचे आवाहन

पुणे – गुढीपाडव्यासाठी आंबा पिकलेला हवा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाकडून गुलटेकडीतील मार्केटयार्ड परिसात आंबा व्यापाऱ्यांकडून या कॅल्शियअम कार्बाईडचा वापर होत नाही ना, याची तपासणी करण्यात येणार आहे.

नैसर्गिकरित्या आंबा पिकण्यास विलंब लागत असल्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून आंबा पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर होत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले आहे. त्याबाबत काही व्यापाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. दरम्यान, शहराच्या काही भागात मार्केट यार्डाच्या बाहेर छोट्या स्वरूपातील गोदामे भाड्याने घेण्यात आली. तेथे कॅल्शिअम कार्बाईड लावण्यात आलेल्या आंब्यांच्या पेट्या भरण्यात येतात. तेथे अर्ध्या स्वरूपात आंबा तयार करण्यात येतो. नंतर मार्केट यार्डातील गाळ्यांवर तो पिकविण्यात येतो. चोरी छुपे मार्गाने सुरू असलेल्या कॅल्शिअम कार्बाईडच्या वापरास अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये मनाई आहे. कायद्याचा भंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, येत्या काही दिवसात मार्केट यार्डातील आंबा विक्रेत्यांकडे आंब्याची तपासणी केली जाणार आहे. त्या वेळी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर केला जातो, की नाही हेही तपासले जाणार आहे. आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड वापरण्यात येऊ नये.

Leave a Comment