पुणे : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर बालविवाह उघड

पुणे- अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मुलीच्या आई-वडील आणि सासरच्यांवर लोणी-काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीची नुकतीच प्रसुती झाल्यानंतर समोर आला. ससूनच्या डॉक्‍टरांनी याबाबत फिर्यादी दिली आहे.

डॉ. अपेक्षा यशवंत करमणकर (28) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी या ससून रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कर्तव्य करत असताना त्यांनी रुग्णालयात एका गरोधर महिलेची प्रसुती केली. तिच्यावर पुढील उपचार करण्याचे काम करत असताना संबंधित महिला अल्पवयीन असताना तिचे लग्न करून दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. पतीपासून ती गर्भवती राहिल्याने तीची प्रसुती 14 मे रोजी झाली. तिच्या आई-वडीलांनी व सासु-सासऱ्यांनी बालविवाह करण्यास चालना दिल्यामुळे बालविवाहाचा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्‍टरांनी याबाबत फिर्याद दिली. ऑगस्ट 2021 मध्ये मुलगी सज्ञान नसताना तिचा विवाह लावल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या आई-वडील, तिचा पती, सासू सासरे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमानुसार तसेच बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे तपास करत आहेत.