PUNE: महापालिकेतर्फे बालोत्सव; २६७० मुलांचा सहभाग

पुणे : बालोत्सवाचे उद्‌घाटन नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मल्लिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संजय माने, व्हॅन लीर फाउंडेशन- भारताच्या प्रतिनिधी इपशिता सिन्हा यांनी केले.

पुणे – पुणे महापालिकेने ‘व्हॅन लीर फाउंडेशन’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘अर्बन95 किड्स फेस्टिव्हल’ला मुलांचा आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा बालोत्सव आयोजित केला होता. पहिल्या दिवशी १५ शाळांनी बालोत्सवाला भेट दिली. २६७० मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जादूचे खेळ, कोड्यांचे खेळ, लहान मुलांच्या गोष्टी, पपेट शो, प्रतिसादात्मक पालकत्व, मातीची भांडी बनवणे, वाळू खेळणे आणि संवेदनात्मक खेळ अशा विविध उपक्रमांचा आनंद घेतला.

नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मल्लिक, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) विकास ढाकणे, उपायुक्त संजय माने, व्हॅन लीर फाउंडेशन- भारताच्या प्रतिनिधी इपशिता सिन्हा यांनी उद्घाटन केले. विशेषत: कथाकथन आणि पुस्तकांद्वारे मुले आणि पालकांमधील संवाद वाढवण्यासाठी पुस्तकांच्या स्वरूपात नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे पाठिंबा देईल असे मल्लिक म्हणाले.

माझे निरीक्षण आहे की, मुले, पालक आणि त्यांचे संगोपन करणारे या कार्यक्रमात आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमाचा आनंद घेत आहेत. अर्बन९५ बालोत्सवाला चांगली सुरुवात झाली आहे आणि मनपाच्या दुसरा बालोत्सव यशस्वी होणार आहे, असे ढाकणे म्हणाले.