Pune: रमजान ईदसाठी शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पुणे – रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर गोळीबार मैदानाकडे जाणार्‍या वाहतुकीत बदल केला जाणार आहे. शनिवार २२ अथवा रविवार २३ एप्रिलला शहरात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. या दिवशी मुस्लीम बांधव एकत्र येऊन आपल्या भागातील मशिद व ईदगाह मैदानावर तसेच सार्वजनिक ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे व्हावी, यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

गोळीबार मैदान चौक येथे होणार्‍या नमाज पठणाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव येतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ज्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाईल, त्यादिवशी सकाळी सहा वाजल्यापासून ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकते नुसार वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांनी या दिवशी पुढील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर ये- जा करण्यासाठी करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

१. सोलापुर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारी वाहतूक ही गोळीबार चौकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या दिवशी नागरिकांनी पर्यायी मार्गानेे मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पीटल मार्गे डाव्हर्शन करुन पुढे इच्छितस्थळी किंवा नेपिअर रोडने पुढे सीडीओ कडे जावे.

२. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी बंद केला जाणार असून येथील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्याबाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन चौकातून इच्छितस्थळी जावे.

३. सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात सकाळी ९ वाजल्यापासून नमाज पठण होईपर्यंत वळविण्यात येणार आहे. या मार्गाचा वापर करणार्‍या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग – लुल्लानगरकडुन येवुन खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगला चौक – नेपीयर रोड मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन – चौकातून इछितस्थळी जातील.

४. सेव्हन लव्हज चौक कडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतुक वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग- सॅलेसबरी पार्क – सी.डी.ओ. चौक भैरोबानाला येथुन इच्छित स्थळी जावे.

५. भैरोबानाला ते गोळीबार मैदानकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथुन वळविण्यात येवुन एम्प्रेसगार्डन आणि लुल्लानगरकडे सोडण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रोडने किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौक येथून इच्छितस्थळी जावे.

६. कोंढवा परीसरातून गोळीबार मैदानाकडे येणारीा सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बसेस, प्रवासी एस टी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन लुल्लानगर चौकातुन भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातुन इच्छित स्थळी जातील.

याबरोबर शहरातील अन्य भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार असल्याने अशा भागातील वाहतूकीचे नियोजन, तेथील परिस्थितीनुसार बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी वाहतूक पोलीसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.