पुणे :”महाआघाडी”साठी कॉंग्रेसही सकारात्मक

पुणे – आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी स्थानिक आघाडीसाठी चर्चा सुरू केली आहे. शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच कॉंग्रेससोबत आघाडीसाठीची प्राथमिक बैठक पार पडली. दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांसह दोन प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या या बैठकीत “कॉंग्रेस आघाडीत येण्यास तयार आहे का?’ हा मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला. त्यावर कॉंग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि आता कॉंग्रेसही आघाडीसाठी तयार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग असणार आहे. ही प्रभाग रचना अद्याप अंतिम झालेली नसली, तरी तीनही पक्षांनी एकत्र येण्याचा सूर आळवला आहे. मागील आठवड्यात याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची बैठक झाली. यात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीसह जागा वाटप कसे असेल? याबाबत प्राथमिक चर्चा झाली.

त्यात, विद्यमान नगरसेवकांच्या जागा कायम ठेऊन इतर जागांमध्ये जेथे मागील निवडणुकीत ज्या पक्षाचा दुसऱ्या क्रमाकांचा उमेदवार होता, तिथे त्या पक्षाची जागा असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेची अद्याप कॉंग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. मात्र, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षांनी आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

फक्‍त आघाडीची चर्चा…
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच कॉंग्रेसच्या शहरातील काही नेत्यांनी “कॉंग्रेसला सन्मानाने जागा न मिळाल्यास महापालिका निवडणुका स्वबळावर लढू,’असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही स्थानिक पातळीवर सावध भूमिका घेतली जात होती. या बैठकीत राष्ट्रवादीने “कॉंग्रेस आघाडीसाठी तयार आहे का?’ हा पहिला प्रश्‍न उपस्थित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावेळी केवळ आघाडीबाबत चर्चा झाली. तर, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेप्रमाणे जागा वाटपाबाबत कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नाही. तसेच पुढील आठवड्यात या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी पुन्हा चर्चेसाठी बसणार असल्याची माहिती आहे.