पुणे: सणसवाडीत अद्ययावत “सनग्लो क्रिकेट स्टेडीयम’ची उभारणी

पुणे – सध्या प्रत्येकाच्या मनात क्रिकेट विषयी प्रचंड आकर्षण आहे. आपल्या घरात, आपल्या परिवारात क्रिकेटर घडावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. हीच बाब लक्षात घेऊन सणसवाडी येथील उद्योजक सोमनाथ दरेकर यांनी पुढाकार घेत, सणसवाडीत राष्ट्रीय दर्जाचे भव्य सनग्लो क्रिकेट स्टेडीयम उभारले आहे. याच ठिकाणी येत्या १६ एप्रिलला प्रसिद्ध क्रिकेटपटु महेंद्रसिंग धोनी यांच्या एम. एस. धोनी क्रिकेट अकॅडमीच्या शाखेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे.

सणसवाडी येथे इस्पात कंपनीमागे नरेश्वर देवस्थान जवळ उद्योजक सोमनाथराव दरेकर यांनी सुमारे ९ एकर जागेत दर्जेदार लॉन तसेच सर्व सुसज्ज सुविधांसह क्रिकेटचे भव्य स्टेडीयम उभारले आहे. क्रिकेट बरोबरच इतरही खेळांसाठी आवश्यक अशा सर्व साधन सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्याने आता सराव तसेच प्रशिक्षणासाठी शहरात जाण्याची गरज उरली नाही. पुण्यापासून जवळच सणसवाडी येथे उभारण्यात आलेल्या या क्रिकेट स्टेडियम मुळे शहर, उपनगर तसेच ग्रामीण भागातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा स्पर्धा आयोजक तसेच आपला पाल्याचे खेळात करीअर करु इच्छिणाऱ्या अनेक पालकांचे स्वप्न या माध्यमातून साकार होणार आहे.

एम. एस. धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, माजी पोलीस अधिक्षक विक्रम बोके, द कॅथोलिक सिरीयन बँकेचे झोनल मॅनेजर (वेस्ट झोन) रोहित धर, रणजी ट्रॉफीचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, शंतनू सुगवेकर, आरका स्पोर्ट्सचे एमडी मिहीर दिवाकर, संचालक बाबुराव यादव, राज्याचे जॉईन्ट जीएसटी कमिशनर जी श्रीकांत (IAS), माजी महिला कसोटीपटू नीता कदम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या सदस्या अँड. कमल सावंत, शिरुरचे आमदार अशोकबापू पवार, वडगाव शेरीचे आमदार सुनीलआण्णा टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे शहर बीजेपी अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके, शिरूरच्या सभापती सौ. मोनिकाताई हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पाचुंदकर, तसेच सणसवाडीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अद्ययावत अशा सनग्लो क्रिकेट स्टेडीयममध्ये खेळांसाठी आवश्यक अशा सर्व सुविधा आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एम. एस. धोनी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून किमान ७ वर्षापासून पुढील खेळाडुंना क्रिकेटचे प्रशिक्षण सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु घडतील, असा विश्वास उद्योजक सोमनाथराव दरेकर तसेच एम. एस. धोनी क्रिकेट अँकॅडमीचे अनिल वाल्हेकर तसेच क्रिकेट मास्टर्स प्रोफेशनल अकॅडमीचे अमोल माने तसेच यांनी व्यक्त केला आहे.