Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

पुणे – पुणे महानगरपालिकेतील सभागृहनेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात काल गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे.

सार्वजनिक जीवनात असल्यामुळे कोणीतरी माझी बदनामी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी तक्रारअर्जात नमूद केले आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झाले असताना बिडकर यांच्या व्यक्तीगत मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉटसअप कॉल आला.

हिंदीमिश्रित मराठीत बोलत असलेल्या व्यक्तीने प्रारंभी शिवीगाळ केली. तुला राजकीय मस्ती आली आहे आणि २५ लाख रूपये दिले नाहीत, तर तुझे राजकीय जीवन संपवून टाकेल, अशी धमकी या व्यक्तीने दिली. आता तुला राजकीय जीवनातून संपवण्यासाठी मी तुझी बदनामी सुरू करणार आहे, अशीही धमकी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिली.

माझी राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी सांगितले. ज्या क्रमांकवरून धमकीचा फोन आला तो क्रमांक पोलिसांनी तक्रारीत नोंदवून घेतला आहे.