Pune Crime : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातुन तरुणास जबर मारहाण करीत लुटले

पुणे – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातुन सराईत गुन्हेगारासह तिघांनी तरुणावर बेदम मारहाण केली. त्याचबरोबर तरुणाच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. हि घटना बुधवारी दुपारी चार वाजता वारजे येथे घडली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मंगेश विजय जळीतकर (वय 22, रा. शिवणे), रोहीत राजुभाऊ भडके (वय 27, रा. कर्वेनगर), सौरभ प्रकाश मोकर (वय 20 , रा. भाजीमंडई, उत्तमनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत राठोड (वय 20, रा, गोकुळनगर पठार, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे त्यांच्या मामाला जेवणाचा डबा देण्यासाठी वारजे येथील गोकुळनगर परिसरात गेले होते. त्यावेळी ते वारजे येथील वाहने पार्कींग करण्याच्या ठिकाणी त्यांची दुचाकी पार्किंग करण्यासाठी थांबले. त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यांना नकार दिला. त्याचा राग आल्याने तिघांनीही फिर्यादीस जबर मारहाण केली. त्याचबरोबर त्यांच्या खिशातील एक हजार रुपयांची रक्कमही जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेमुळे स्थानिक नागरीक फिर्यादीच्या मदतीसाठी धावले, त्यावेळी आरोपींनी नागरीकांच्या दिशेने कोयता दाखवित दुचाकीवरुन तेथून पळ काढला. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक केली. या घटनेतील जळीतकर हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुनाहेगार असून त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. यापुर्वीच त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई झालेली आहे.