धक्कादायक : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला दिले पेटवून, पुण्यातील घटना

पुणे – वडिलोपार्जीत संपत्तीच्या वादातून सख्या बहिणीला पेटवून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार औंध येथील अनुसया सोसायटीत घडला. आरोपीच्या या कृत्यामुळे बहीण गंभीर जखमी झाली ती उपचार घेत आहे.

याप्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणी नगर फेज 2, बिबवेवाडी) याला चतुरशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत राजश्री मनोहर पतंगे (48, रा. अनुसया हौसिंग सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद आणि राजश्री हे सख्खे भाऊ बहीण आहेत. दोघांचा वडिलोपार्जित संपतीवरून वाद आहे. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे वडिलांचे निधन झाले आहे. शुक्रवारी (दि.24) दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्री यांच्या घरी गेला. त्यावेळी त्या स्वयंपाक घरात खुर्चीवर आराम करत होत्या. त्यांच्यात पुन्हा वडिलोपार्जित संपत्तीतून वाद झाले.

याच दरम्यान त्याने त्याच्या जवळील कडेपेटीतील काडीने आग लावून बहिणीला पेटून दिले. आरोपीने पेटवून दिल्याने राजश्री या गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पवार करीत आहेत.