Pune Crime News : आजीबाईंच्या प्रसंगावधानामुळे चोरटा गजाआड…

पुणे :  मागील काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातारा रस्त्यावर पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील बांगडी चोरट्यांनी कटरने कापली. गर्दीत बांगडी कापणाऱ्या चोरट्याला ज्येष्ठ महिलेने पकडले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार ज्येष्ठ ‌महिला जांभुळवाडी परिसरात राहायला आहेत. त्या स्वारगेट ते जांभुळवाडी या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरटे बसमधील शिरले होते. ज्येष्ठ महिलेला बसमध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्या उभ्या होत्या. चोरट्यांनी गर्दीत ज्येष्ठ महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी कटरने कापली.

हातातील बांगडी चोरटा कापून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला ज्येष्ठ महिलेने पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. चोरटा आणि साथीदार बस थांब्यावर उतरले. ज्येष्ठ महिलेचा आरडाओरडा प्रवाशांनी ऐकला. पद्मावती परिसरात प्रवासी आणि नागिरकांनी पाठलाग केला तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार सुशांत फरांदे आणि महेश मंडलीक यांनी चोरटा चांदबाबू अलीहुसेन शेख ( ३०, रा. बेचाळीस चौक, कोंढवा खुर्द) याला पकडले. त्याला ताब्यात घेण्यात आले.

शेखला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.