Pune Crime : विनयभंग प्रकरणात तिघांना 6 महिने सक्तमजुरी

पुणे – पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूणीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विठ्ठल सदाशिव शिंदे, बाबु गणपत इंगुळकर, रविंद्र लक्ष्मण राजणे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये पीडित तरूणीला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ऍड. नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी या प्रकरणात सात साक्षीदार तपासले. 21 मार्च 2016 रोजी ही घटना घडली. संबंधित तरूणी ही तिच्या मामेबहिणीसह हापश्‍यावर पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी, आरोपींनी तिचा विनयभंग केला.

याखेरीज, यापुर्वीही ती महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करून तिला त्रास देण्यात आला होता. यावेळी, गावामध्ये बैठक बोलावून वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तरीही हा प्रकार न थांबल्याने तिने 24 मार्च 2016 रोजी आरोपींविरोधात वेल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 अ, ड सह कलम 54 अन्वये गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Leave a Comment