पुणे : कर सवलत अर्जास अखेर मुदतवाढ

30 नोव्हेंबरपर्यंत “पीटी-3′ अर्ज भरून घेता येणार 40 टक्केचा लाभ

पुणे – शहरातील ज्या निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून “पीटी-3′ अर्ज भरून घेतला जात आहे. हा अर्ज भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या बाबतचे आदेश आयुक्‍त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले. या अर्जांसाठी 15 नोव्हेंबर ही शेवटची मुदत होती.

सलग शासकीय सुट्यांमुळे मुदतवाढ देण्याबाबत सोमवारी (दि.13) मिळकतकर विभागाने महापालिका आयुक्‍तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस पुन्हा शासकीय सुट्टी असल्याने गुरूवारी अखेर याबाबतचे आदेश काढण्यात आले.

शहरातील सुमारे तीन लाख मिळकतधारकांची ही सवलत रद्द झाली असली, तरी अद्याप केवळ 60 हजार नागरिकांनीच हा अर्ज भरलेला होता. तर सोमवारी दिवसभर पुणेकरांनी हा अर्ज भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रांगा लावल्या होत्या.

त्यामुळे या एकाच दिवशी जवळपास 19 हजार पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले तर गर्दीमुळे तसेच ऑनलाइन अर्ज भरण्यात अडथळे येत असल्याने अनेकांना अर्ज भरता आला नाही. यातून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सवलत जाणार; थकबाकी भरावी लागणार
महापालिकेने 2019 पासून सर्व नवीन निवासी मिळकतींची कर सवलत रद्द केलेली आहे. त्यामुळे ते 100 टक्के कर भरत होते, त्याच प्रमाणे पालिकेने शहरात तपासणी केल्यानंतर ज्या निवासी मिळकतींचा वापर व्यावसायिक केला जात आहे अथवा जेथे भाडेकरू राहत आहेत, अशा मिळकतींना मागील तीन वर्षांच्या थकबाकीसह, 40 टक्के सवलत रद्द करून लाखभर रुपयांच्या थकबाकींची बिले पाठविली आहेत.