Pune: पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश अर्ज आजपासून

पुणे – बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्‍यानंतर आता शहरातील नामांकित वरिष्ठ महाविद्यालयातील बीए, बीकाॅम आणि बीएस्सीसह अन्य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि.२२) सुरु होत आहे. त्‍यामुळे प्रवेश घेऊ इच्‍छुणाऱ्य विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचे संकेतस्‍थळाला भेट देऊन त्‍यानुसार अर्ज करावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

बारावी निकालानंतर आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहे. निकाल लागला, पण कोणत्‍या वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश कधी सुरू होणार आहे, त्‍यासाठी कोठे संपर्क करायचा, आॅनलाइन अर्ज कसा करायाचा असा प्रश्न पालकांपुढे निर्माण होत असतो. मात्र करोना काळानंतर सर्व महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रवेशाची पद्धत सुरू केली आहे. त्‍यामुळे संबंधित महाविद्यालयाच्‍या संकेतस्‍थळावरुन माहिती घेणे आवश्यक आहे.

प्राचार्यांनी दिली माहिती…

१. बृहन महाराष्ट्र काॅलेज आॅफ काॅमर्स (बीएमसीसी) : बी.काॅम.च्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी लिंक सुरू झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे प्राचार्य जगदीश लांजेकर यांनी सांगितले.
२. मराठवाडा मित्र मंडळाच्‍या काॅलेज आॅफ काॅमर्स (एमएमसीसी) : प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मेरिट अर्ज भरण्यासाठी आठवडाभराची मुदत आहे, अशी माहिती प्राचार्य देविदास गोल्हार यांनी दिली.
३. गणेशखिंड व शिवाजीनगरच्‍या माॅडर्न महाविद्यालय : प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज बुधवारपासून करता येणार आहेत, असे प्राचार्यांनी सांगितले.

“महाविद्यालयाची सर्व माहिती संकेतस्‍थळावर असते. मात्र, प्रवेश अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी प्रत्‍यक्ष महाविद्यालयास भेट द्यावी. यंदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक अभ्यासक्रमांची रचना वेगवेगळी असेल. त्‍यादृष्टीने संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्यांशी भेटून सर्व माहिती घ्यावी. त्‍यानंतर अर्ज भरणे योग्य राहील.” – डाॅ. राजेंद्र झुंजारराव, माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

अर्ज कसा करावा
१. महाविद्यालयाचे संकेतस्‍थळ पाहा
२. आॅनलाइन अर्ज भरा
३. आठभरानंतर मेरिट लिस्‍ट लागेल
४. त्‍यानुसार कागदपत्रे दाखून प्रत्‍यक्ष प्रवेश घ्या.