पुणे जिल्हा :1138 विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

* विद्यार्थी, पालकांमधून नाराजीचा सूर
*  वाल्हे परिसरातील शाळांमध्ये चार महिन्यांपासून पुरवठा बंदच
वाल्हे  – मागील दीड-दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद होत्या. तत्पूर्वी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून दिला जात होता. त्यानंतर धान्याच्या स्वरूपात पोषण आहार दिला जात होता. मात्र, सप्टेंबरपासून आजवर शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाल्हे परिसरातील शाळांमधील 1138 विद्यार्थी पोषण आहारापासून वंचितच आहेत.

यापूर्वी शालेय पोषण आहार अभियानांतर्गत प्राथमिक शाळेतील इयत्ता पहाली ते चौथी व माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना आहार शिजवून दिला जात होता. करोना संकटामुळे शाळा बंद झाल्यानंतर धान्य व डाळीच्या स्वरूपात पोषण आहार देण्यात येत होता. शेवटचा पोषण आहार जून, जुलै, ऑगस्ट 2019 मध्ये विद्यार्थ्यांना धान्याच्या स्वरूपात दिला गेला. त्यानंतर सप्टेंबर 2019 पासून आजपर्यंत शालेय पोषण आहाराचा पुरवठा शासनाकडून झालेला नाही.

सप्टेंबर 2021 मधील शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 4 ऑक्‍टोबर 2021 पासून सर्व प्रकारचे शासन नियम व सूचनांचे पालन करून माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. ऑगस्ट महिन्यापासून नोव्हेंबर अखेर शासनाकडून शालेय पोषण आहार उपलब्ध झालेला नाही.

वाल्हे प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबांतील तसेच भटक्‍या समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना दोन वेळचा पुरेसा आहार मिळत नाही. उपाशीपोटी शाळेत यावे लागते, काही विद्यार्थी शाळेत भात मिळत नाही म्हणून अजून शाळेकडे फिरकलचे नाहीत. अशा व इतर नियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला पाहिजे.
– दादासाहेब राऊत, माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, वाल्हे

या शाळांमधेल विद्यार्थी वंचित
वाल्हे प्राथमिक शाळेत 127, रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयात पाचवी ते आठवीपर्यंत 447 विद्यार्थी, दौंडज प्राथमिक शाळेत 81, डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयात 156, पिंगोरी प्राथमिक शाळेत 30, वाघेश्‍वरी माध्यमिक विद्यालयात 30, कवडेवाडी 5, तरसदरा 22, वागदरवाडी 25, धनगरस्थळ 2, आडाचीवाडी 18, कामठवाडी 25, माळवाडी 32, वरलामळा 30, मदनेवस्ती 19, हनुमान वस्ती 13, भुजबळवस्ती 7, सुकलवाडी 29, अंबाजीचीवाडी 16, गायकवाडवाडी 13, मुकदमवाडी 11 असे एकूण 1 हजार 138 विद्यार्थ्यांना पोषाण आहारपासून वंचित आहेत.