पुणे जिल्हा : बारामती तालुक्यात १४५.६ इतकी टक्केवारी

तीन दिवसात १२६.६ टक्के नोंद
बारामती –
बारामती शहर व तालुक्यात पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली आहे. तालुक्यात तीन दिवसात १२६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत बारामती तालुक्यात १४५.६ एवढी टक्केवारी पावसाने गाठली आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. (दि.९) रोजी सर्वाधिक ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बारामतीत पाऊस धो धो बरसला. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून यंदाचा खरिपाचा हंगाम भरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिरायत भागात पाणीटंचाईचा सामना नागरिक करत होते. पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पावसाने आणखी ओढ दिली असती तर जिरायतीबरोबरच बागायती भागात देखील बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. अशातच सलग तीन दिवसांच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तीन दिवसांपैकी एक दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. दोन दिवस संतधार पावसाने हजेरी लावली. मान्सूनच्या सुरुवातीलाच बारामतीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ओढे वाहिले आहेत.

बरमाती तालुक्यातील वाहिले. उन्हाळ्यात फाटलेल्या विहिरी पाण्याने भरल्या. बागायती भागात विहिरीभरून पाणी वाहिले. बारामतीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आहे.

यंदाचा खरीप बहरणार
आवर्षणग्रस्त तालुका म्हणून बारामती कडे पाहिले जाते. पावसाचे अल्प प्रमाण असल्यामुळे खरिपाचा हंगाम निश्चित स्वरूपाचा नसतो. त्यामुळे अनेक वेळा खरिपाचा हंगाम वाया गेला आहे. दुबार पेरणीचे संकट देखील शेतकऱ्यांवर अनेक वेळा आले . यंदा मात्र पावसाने चांगले संकेत दिले असल्याने शेतकरी समाधानी झाला असून खरिपाचा हंगाम यांचा बहरेल अशी आशा व्यक्त होत आहे.

बऱ्याच वर्षानंतर मृग बरसला
बऱ्याच वर्षानंतर मिरगाचा पाऊस पडल्याचे जुन्या जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आले. शक्यतो बारामती तालुक्यात मिरगाचा नक्षत्र वाया जाते. या नक्षत्रामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्याचे आजवरचे चित्र आहे. यंदा मात्र वरून राज्याच्या कृपेने मिरगाच्या नक्षत्रात पाऊस आणि चांगली टक्केवारी गाठली आहे.