पुणे जिल्हा: बियांपासून तयार केली दीडशे झाडे

पेठ, (ता. आंबेगाव) ः उत्तमरीत्या जोपासलेली झाडे दाखवताना महिला शेतकरी जयश्री धुमाळ.

पेठ – पेठ (ता. आंबेगाव) येथे जवळपास दीडशे झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन जयश्री दिलीप धुमाळ आणि दिलीप बाबाजी धुमाळ यांनी केली आहे. यामधील अनेक झाडे ही बियापासून तयार केलेली असून त्यात चिंच, जांभूळ, आंबा, उंबर यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे. येथे

एकंदरीत ३० प्रकारचे वृक्ष असून त्यामध्ये उंबर, कडुलिंब, फणस, आपटा, बेल, नारळ, बांबू, अशोक, सीताफळ, आंबा, पेरू, साग ,बदाम, बाबुल, कागदीलिंबू ,चिंच, रामफळ, सीताफळ, जांभूळ, बेहडा, चिक्कू, शिसव, रक्तचंदन आदी झाडांचा समावेश आहे. यामध्ये फुलझाडांची तर गणती नाही. जास्वंदीच्या फुलांचे १६ प्रकार येथे आहेत. ओरिजनल कन्हेर, विविध प्रकारचान सोनचाफा असून, कढीपत्त्याचे, कोरफडीचे देखील अनेक प्रकार आहेत. कोरफडींना पिवळसर आणि लालसर फुले आलेली आहेत ही सर्व झाडे वाढवायला १७ ते २० वर्षाची तपश्चर्या आहे.

या झाडांमुळे भागामध्ये मुंगसांची संख्या वाढली असून, खारुताईपासून अनेक छोट्या-मोठ्या पक्ष्यांची संख्या येथे वाढली आहे. या पक्ष्यांसाठी बाजरी, गहू, तांदूळ, भरलेला हरभरा, मका, ज्वारी, डाळी यांपासून भरड धान्य तयार करून पक्ष्यांसाठी घातले जाते आहे, तसेच त्यांच्यासाठी पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे.

चहा पावडरचे सेंद्रिय खत

येथील झाडांच्या जोपासणीसाठी आणि कीड-रोगांचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी फवारणी सुद्धा केली जाते, तसेच पाला, पाचोळा, लेंडी खत, शेणखताबरोबरच येथील हॉटेलमधून जमा केलेली चहा पावडर सेंद्रिय खत म्हणून टाकली जाते. झाडांची पान गळती झाडांच्या बुंध्यापाशी टाकून त्याचेही खत तयार केले जाते आणि त्याचा उपयोग झाड वाढीसाठी चांगला होतो.

उन्हाळ्यामध्येही पाण्यासाठी सोय

पंधरा एक वर्षांपूर्वी डोक्यावर हंडे घेऊन पाणी घालून झाडे जगवलेली आहेत. झाडांसाठी आता पाट तयार करून आठवड्यातून दोन वेळा विद्युत मोटारीद्वारे झाडांना पाणी दिले जाते. साधारणपणे दीड फुटावर मुरम असल्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना उन्हाळ्यामध्ये पाणी हे द्यावेच लागते.