पुणे जिल्हा : कडूसमध्ये 170 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

जेईई, नीट परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी
47 मुले 12 मुलींना त्रास : दोघांवर वायसीएममध्ये उपचार सुरू
राजगुरूनगर –
कडूस (ता. खेड) येथील दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणार्‍या देशातील 600 पैकी सुमारे 170 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी (दि. 20) घडला. 170 पैकी 47 मुले आणि 12 मुली असे 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

दक्षणा फाउंडेशन ही सेवाभावी आणि गैरसरकरी संस्था आहे. ही संस्था देशातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या जेई आणि नीट परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना मध्यरात्री पासून जुलाब, तीव्र डोकेदुखी, पोटदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने उपचारासाठी त्यांना कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर चांडोली येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर राजगुरूनगर (चांडोली) ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चांडोली ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून या विद्यार्थ्यांवर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. कौस्तुभ गरड, डॉ. मयुरी मालाविया, अल्त्ताफ पठाण, अर्चना धोंडवड, संध्याराणी हजारे, अर्चना छानवाल, वर्षा गायकवाड, मुख्तार शेख, आशा नवगिरे, धनंजय घोसाळकर, माधुरी गोरडे, संगीता पिंगळे, वर्षा आनंदे, दीपक शेलार यांनी उपचार केले.

दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक निरीक्षक बी. एन. काबुगडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली.

 काही घातपात आहे का ?
या विद्यार्थ्यांना विषबाधा कशी झाली कोणता पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाली.यासाठी अन्नाचे नमुने, विद्यार्थ्यांच्या उलटीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत तर या घटनेत काही घातपात आहे का? याचाही तपास केला जाणार आहे.

या घटनेत 170 पैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 111 बाधित विद्यार्थ्यांवर कडूस येथे दक्षणा फाऊंडेशनमध्ये जाऊन कडूस, वाडा, चास आदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी उपचार केले.
– डॉ.पूनम चिखलीकर, वैद्यकीय अधीक्षक,