पुणे जिल्हा : हातभट्टीचा ४ लाखांचा साठा जप्त; शिंदवणे येथे कारवाई, एकावर गुन्हा

उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) येथील हद्दीत घराच्या आडोशाला गावठी तयार दारू विक्री व तयार करणाऱ्या व्यक्तीला मुद्देमालासह उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कच्चे रसायन व तयार दारू असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लाला उर्फ कांतीलाल जवाहर राठोड (वय ३४, रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे ता. हवेली), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. २९) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत राठोड हा घरात हातभटटीची दारब बनवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी दारू बनवण्याचे साहित्य व कच्चे रसायन, प्लास्टिकची कॅन्ड, गावठी हातभट्टीची तयार दारू, जवळच्या एका पडक्या घरामध्ये निळया व काळया व पिवळया रंगाचे प्लॅस्टिकचे कॅन्डमध्ये ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत. ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पडुळे, सहाय्यक फौजदार उमेश जगताप, हवालदार रमेश भोसले, सचिन जगताप, शशिकांत खाडे, होळकर, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, अक्षय कामटे, अमोल राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नागरगोजे, घाडगे, भुजबळ यांनी केली आहे.