PUNE: शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश; जिल्ह्यात फक्‍त 67 टक्‍के पाऊस!

पुणे – जिल्ह्यातील 54 महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड सुमारे 22 ते 35 दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. आता कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 455 मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी 684 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाऊस केवळ 67 टक्केच आहे.

सर्वांत कमी पाऊस पुरंदर तालुक्‍यात केवळ 38 टक्के झाला असून हवेलीत 39 तर बारामतीत केवळ 40 टक्के झाला आहे. इंदापूर, दौंड शिरूर या तालुक्‍यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ही स्थिती पाहता पीक विमा योजनेच्या निकषांनुसार पावसात 21 दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.