पुणे जिल्हा : सैन्य दलात अखिलेशची लेफ्टनंटपदी निवड

शिक्रापूर – निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अखिलेश संतोष विधाटे याने मोठ्या खडतर प्रवासातून केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादित केले. अखिलेश विधाटे याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने अखिलेशची मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील अखिलेश विधाटे याचे आई वडील नोकरीच्या निमित्ताने शिक्रापूर येथे वास्तव्यास असल्याने अखिलेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर येथे झाले. दरम्यान, त्याने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. पाचवी ते दहावीचे शिक्षण पुण्यात सुरु असताना अखिलेशने भारतीय सैन्यदलात दाखल होण्याचे ठरवले. यानंतर पुढील महाविद्यालयीन संभाजीनगर व पुणे येथे झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अखिलेशने आई ज्योती व वडील संतोष यांच्या मार्गदर्शनाने जिद्दीने अभ्यास करुन यश मिळवले.

अखिलेश याचे भारतीय सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण होत त्याची लेफ्टनंटपदी निवड झाली असल्याने ग्रामस्थांच्या वतीने अखिलेश विधाटेची मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, माजी सभापती आरती भुजबळ, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, ग्राहक पंचायतचे धजय गायकवाड, सरपंच बापुसाहेब काळे, पोपटराव भुजबळ, अरुण भुजबळ, संभाजी भुजबळ, बापूसाहेब काळे, तेजस यादव, सचिन चव्हाण, विक्रम चव्हाण, राहुल रणशिंग, कविता चौधरी, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, मोहिनी मांढरे,

संदीप भुजबळ, गुलाबराव सातपुते, कानिफ गव्हाणे, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते, दरम्यान अखिलेशसह त्याची आई ज्योती विधाटे, वडील संतोष विधाटे तसेच मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर गायकवाड, सुजाता पुंडे व रत्नप्रभा कामठे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सैन्य दलाचे स्वप्न पाहिल्यानंतर सतत अभ्यास, शारीरिक तंदुरुस्तीची तयारी केली. शैक्षणिक संस्थेतील प्रशिक्षण व कडक शिस्त यामुळे माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे अखिलेश विधाटे याने सांगितले. लवकरच अखिलेश डेहराडून येथे प्रशिक्षणार्थी तो हजर होणार आहे. यावेळी संतोष विधाटे यांनी आभार मानले.

तीन महिन्यांत दोन मिरवणूक
निमगाव म्हाळुंगी येथील ऋतुजा भोरडेची वनविभागात वनरक्षकपदी निवड झाल्यानंतर मार्चमध्ये तिची मिरवणूक काढण्यात आलेली होती. नुकतेच अखिलेश विधाटे याची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाल्याने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे ग्रामस्थांनी तीन महिन्यांत दोन मिरवणुका अनुभवल्या. मात्र, मिरवणुका शालेय युवकांना प्रेरणादायी आहे.