पुणे जिल्हा : गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्यांना अटक

माळेगावात दोघांना अटक

माळेगाव – गर्भलिंग निदान करण्यास कायद्याने बंदी असताना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील डॉक्टरसह त्याच्या साथीदाराने एका महिलेची गर्भलिंग चाचणी केली. याप्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.

शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) व त्याचा साथीदार नितीन बाळासो घुले (वय ३४, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी फिर्याद दिली.

माळेगावातील गोफणे वस्तीनजीक एका ठिकाणी बांधकाम सुरु आहे. तेथे डॉ. शिंदे व त्याचा एजंट घुले यांनी एका महिलेची गर्भनिदान चाचणी केली. घटनेच्या ठिकाणी ते सोनोग्राफी मशिनसह आढळून आले. त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.