पुणे जिल्हा: माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागांवर कुर्‍हाड

रांजणी  – माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागांवर शेतकर्‍यांकडून कुर्‍हाड चालवली जात आहे. नवीन वाणाच्या द्राक्षांमुळे बाजारातील कमी झालेल्या मागणीमुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष बागा तोडण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर त्याचबरोबर बारामती, इंदापूर तालुक्यात माणिक चमन द्राक्षांच्या बागा आहेत या तालुक्यातील शेतकरी माणिक चमन वाणाची द्राक्षाची पीक घेत असतात. मात्र यंदा माणिक चमन वाणाच्या द्राक्षांना वाईट दिवस आले आहेत. या प्रकारच्या द्राक्षांना बाजारात बाजारभावच उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी बागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या द्राक्ष बागांवर कोयता चालवला जात असून शेतकर्‍यांना माणिक चमन वाणाच्या द्राक्षांचे पीक परवडत नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.

चालू वर्षी द्राक्षांना अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. माणिक चमन वाणाच्या तुलनेत कळमजंबो द्राक्षांना बर्‍यापैकी बाजार भाव असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी साहेबराव पाटील यांनी सांगितले. काळ्या द्राक्षांच्या तुलनेत पांढर्‍या द्राक्षांना कमी बाजारभाव मिळत आहे. वातावरणातील बदल मान्सूनोत्तर पाऊस याचा द्राक्ष बागांवर परिणाम झाला आहे. माणिक चमन या वाणाचे मणी गोलाकार असल्याने लांब मण्याच्या तुलनेत गोल मण्याच्य द्राक्षांना कमी बाजार भाव मिळतो ही द्राक्षे स्थानिक बाजारात विकली जात नाही. त्यांना केवळ 20 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्या तुलनेत काळ्या द्राक्षांना बर्‍यापैकी मागणी आहे.

“काही द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुर्‍हाड चालवली. सतत कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च व उत्पन्नाचा मेळ जमवणे अवघड झाले आहे. पांढर्‍या वाणातील सुपर सोनाका, एसएसएन वाणाच्या द्राक्षांना बर्‍यापैकी दर आहे. मात्र माणिक चमन वाणाची द्राक्षे बाजारात विकली जात नाही. किंबहुना त्यांचा खप होत नाही.” -साहेबराव पाटे, शेतकरी नारायणगाव