पुणे जिल्हा : पदांच्या नियुक्‍तीसाठी पाठशिवणीचा खेळ

गावातील मूलभूत सुविधांसाठी खीळ : विकासकामांवर परिणाम
प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा –
अनेक गावोगावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच ही पदे जणू खिरापत झाल्याची परिस्थिती आहे. कारण, केवळ पदासाठी आणि नावापुढे पद लावण्यासाठी सहा महिने, वर्षे आणि अडीच वर्षाला सरपंच आणि उपसरपंच पदे बदलली जात आहेत. गोंधळात एकूणच गावचा विकास आणि राजकारणावर त्याचा परिणाम होत आहे.

काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतींना उत्पनाचे स्रोत नव्हते. त्यावेळी सरपंच आणि उपसरपंचपदाला फारसे महत्त्व नव्हते. निवडणूक झाल्यानंतर जो सरपंचपदी निवडून येईल, तो पदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करीत होता. मात्र, ग्रामपंचायती मोठ्या झाल्या. गावांच्या हद्दीत उद्योग- व्यवसाय वाढले असून नागरीकीकरण वाढले. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झाली. सरपंच, उपसरपंचपदाचे महत्त्वही वाढले. सध्या सदस्यांमध्ये सरपंच. उपसरपंचपदासाठी रस्सीखेच असल्याचे दिसत आहे.

सरपंच, उपसरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक असतात. आपल्या नावापुढे सरपंच तसेच उपसरपंचपद लागावे, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य बाळगून असतात. एकहाती आणि बहुमत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तर सरपंच. उपसरपंचही पदे खिरापत झाल्याचे चित्र आहे. ज्या वर्गासाठी सरपंचपद आरक्षित आहे, त्या वर्गातील सत्ताधारी गटाकडील सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत कालावधी ठरवून सरपंचपद दिले जाते.

उर्वरित सत्ताधारी गटातील सदस्यांना उपसरपंचपद ठराविक कालावधीसाठी वाटून दिले जाते. भविष्यात एखाद्या सदस्याने ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला नाही, तर अडचण होऊ शकते. यासाठी सरपंच अथवा उपसरपंचपदी निवड होतानाच संबंधितांचा राजीनामा लिहून घेतला जातो. नावापुढे माजी सरपंच, माजी उपसरपंच ही पदे लावण्यासाठी खिरापतीसारखी पदे वाटली जात आहेत.

पदे फक्‍त नावापुरती
या सरपंच आणि उपसरपंचपदांच्या खिरापत वाटपाचा परिणाम गावचा विकास आणि राजकारणावर होताना दिसून येतो. गावचा विकास करण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने अनेकांना त्यांच्या पद्धतीने गावचा विकास करता येत नाही. सरपंच म्हणजे काय? एकूण ग्रामपंचायतींचा कारभार कसा चालतो? आदी गोष्टींची योग्य माहिती होईपर्यंत अनेक सदस्यांच्या सरपंच किंवा उपसरपंचपदाचा कालावधी संपलेला असतो. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच ही पदे खरंच गावच्या विकासासाठी आहेत की नावापुरती आणि दाखविण्यापूरती उरली आहेत? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे.