पुणे जिल्हा : भावडी-लोणी देवकर रस्त्याचे काम निकृष्ट

पळसदेव – लोणी देवकर-भावडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आताच काही दिवसांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप रस्त्याच्या अनेक ठिकाणी साइडपट्ट्या भरण्याचे काम बाकी आहे. आताच अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर काही ठिकाणचे डांबर उखडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आल्याचं सिद्ध होत आहे. तरी या कामाची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी सहकार सेनेचे (शिंदे गट) विभागीय सचिव सूरज काळे यांनी केली आहे. या वेळी सहकार सेनेचे विभगीय सचिव सूरज काळे, जिल्हा अध्यक्ष ( शिंदे गट ) विजय पवार, छगन बनसुडे, सोमनाथ माने उपस्थित होते.

या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची तातडीने चौकशी करून साइडपट्ट्या भरून घेऊन उखडलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा सहकार सेनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. भावडी-चांडगाव रस्त्याच्या कामाच्या डांबरीकरणासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार काम करण्यात आले; मात्र ठेकेदाराने काम करताना दर्जा राखला नाही.

एकीकडे भरणे तालुक्‍याच्या विकासासाठी रात्रीचा दिवस करून अनेक विभागातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणत आहेत; मात्र ठेकेदार आपल्या स्वार्थासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक तडजोडीतून कामे उरकून बिल काढून मोकळी होत आहेत. आलेला निधी जनतेच्या हितासाठी वापरण्या ऐवजी ठेकेदाराच्या खिशात जात आहे. यावर कोणाचाच धाक राहिला नसल्याने तालुक्‍यात आता ठेकेदारशाही सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.

सुरुवातीपासून रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचं आम्ही तक्रारी केल्या; मात्र ठेकेदाराने वेळकाढूपणा करून रस्त्याचे निकृष्ट काम करून घेतलं आहे. तरी या कामाच्या दर्जाबाबत चौकशी व्हावी. खचलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. -मुन्ना आरडे, सरपंच चांडगाव