पुणे जिल्हा : भुयारी मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाची डोळेझाक : खासदार सुळे

नीरा येथील प्रश्‍न ऐरणीवर
नीरा –
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम भागातील लोकांसाठी अंडरपास भुयारीमार्ग काढण्यासाठी मी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे मात्र, या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

नीरा येथील अंडरपास मार्गाच्या मागणी बाबत ग्रामस्थ 5 जानेवारी रोजी नीरा येथे आत्मदहन आंदोलन करणार असल्याबाबत खासदार सुळे यांना मंगळवारी (दि.26) जेऊर येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला होता; त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुणे-मिरज लोहमार्गावरील पुरंदर तालुक्यातील नीरा येथील लोहमार्गाच्या पश्‍चिमेस सुमारे 125 वर्षांपासून मशीद, लोकवस्ती व शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना नीरा गावांतून आळंदी-पंढरपूर रस्त्यावरून पश्‍चिमेस नावेच्या डोव्हाकडे जाण्यासाठी सर्व्हे नंबरचा हक्काचा रस्ता आहे. पूर्व परंपरागत पिढ्यानं पिढ्यांपासून आजपर्यंत स्थानिक रहिवाशी, मुस्लीम बांधव व शेतकरी वापर करत होते. 1967 मध्ये पुणे ते बेळगांव या मीटरगेज रेल्वेचे पुणे-मिरज या लोहमार्गात रूपांतर झाले. तेव्हा एकच रेल्वे लाईन होती. त्याच वेळी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग किवा फरशीपुल करणे गरजेचे होते. त्यानंतर कालांतराने नीरा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत तीन रेल्वे ट्रँक झाले. तोपर्यंत नागरिकांना सहन करीत रेल्वे रूळ ओलांडून जात होते.

सध्या रेल्वेच्या पुणे-मिरज या लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले असून जवळपास दुहेरीकरणही पूर्ण होत आहे. त्यामुळे नीरा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत रेल्वेचे पहिले तीन ट्रॅक असून आणखी तीन ट्रॅक होणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्याचे कामही जोरदार सुरू आहे. त्यामुळे रेल्वे लाइनच्या पश्‍चिमेकडील मशीद, लोकवस्ती व शेतीकडे जाणारा रस्त्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकवस्तीवरील नागरिकांचा जाण्या -येण्याचा रस्ताच रेल्वे प्रशासन बंद करणार असल्याने जगायचे कसे? या विवंचनेतून रहिवाशांसह स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांसह खासदार सुप्रिया सुळे वारंवार पाठपुरवा करीत असूनही रेल्वे मंत्रालय नीरा येथील भुयारी मार्ग करण्याकरिता उदासीन का आहे? असा सवाल नीरा ग्रामस्थ करीत आहे.