पुणे जिल्हा : अपर तहसील कार्यालय निवडणुकीला बुस्टर

शिरूर-हवेली मतदारसंघातील गावांचा समावेश
लोणी काळभोर –
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विधानसभेला निवडून येण्यासाठी मतदारसंख्येच्या दृष्टीने महत्वाची गावे असलेल्या पूर्व हवेलीसाठी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करून आणल्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार अशोक पवार यांना फायदा होणार का, अशी चर्चा पूर्व हवेलीत सुरू झाली आहे.

हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. लोणी काळभोर अप्पर तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात वाघोली, उरुळीकांचन आणि थेऊर या महसुली मंडळांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 44 महसुली गावांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्‍याचा भौगोलिकदृष्ट्‌या विस्तार मोठा आहे. या तालुक्‍यात वाढत्या शहरीकरणामुळे प्रशासकीय कामकाज वाढले आहे. नागरिकांच्या व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने लोणी काळभोर येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी गेले अनेक वर्षे लावून धरली होती.

हवेली तहसील कार्यालयात दैनंदीन कामकाजासंदर्भात दर महिन्याला साधारणतः 7 ते 8 हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिधापत्रिका मिळण्यासाठी दरमहा साधारणत 400 ते 500 अर्ज प्राप्त होतात. हवेली तहसील कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत 6000 दाखले दिले जातात.

वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इत्यादी बाबी विचारात घेता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्‍यासाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयास मान्यता देण्यात आली आहे. हवेली अप्पर तहसीलदार कार्यालय तत्काळ सुरु होणार असून यापुढे नागरिकांच्या समस्येचे जलदगतीने निराकारण होईल.

नागरिकांकडून स्वागत
पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे मान्यता मिळालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणीकंदसह पूर्व हवेलीतील 44हून अधिक गावांतील नागरिकांची महसुली कामे लोणी काळभोर येथील महसुली कार्यालयातून होणार असल्याने पूर्व हवेलीमधून विविध गावचे सरपंच, विविध संघटना व नागरिकांनी वरील निर्णयाचे स्वागत केले आहे.

हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागातील नागरिकांची तहसीलदार कार्यालयातील कामे सोयीस्कर व लवकर होण्यासाठी हवेली तालुक्‍याचे अप्पर तहसीलदार कार्यालय तातडीने करावे अशी मागणी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. या मागणीला यश आले आहे. हवेली तालुक्‍याची लोकसंख्या 35 लाख असून ही संख्या अनेक जिल्ह्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची कामे करण्यासाठी एकच तहसीलदार पुरेसा नाही. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे आपली कामे करुन घेण्यासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागत होते. अपर तहसीलदार कार्यालयामुळे ते नागरिकांना वेळ व पैसा वाचणार आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर हवेली