पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अर्ज दाखल

बारामती (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (गुरुवार) रोजी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात आज अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे आदी उपस्थित होते.

या मतदारसंघात 195 मतदार आहेत. अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून संचालक मंडळही त्यांच्याच संमतीने ठरणार हे उघड आहे. सन 1991 पासून अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले असून सात वेळा ते या बँकेचे अध्यक्ष होते.

राजकारणाचा प्रारंभ या बँकेच्या संचालकपदापासूनच झालेला असल्याने या बँकेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे