पुणे जिल्हा : जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास आवश्यक

– वनपाल सोनल भालेराव यांचे प्रतिपादन
लोणी धामणी –
जैववैधतेचे संतुलन राखण्यासाठी वनांचा विकास व संवर्धन, संरक्षण अत्यंत गरजेचे आहे. वनांमुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत तर होतेच व जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन वनपाल सोनल भालेराव यांनी व्यक्त केले.

धामणी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे वनविभागाच्या वतीने जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. वनपाल सोनल भालेराव पुढे म्हणाले, वनांमुळे प्राणी, पक्षी ,कीटक यांना संरक्षण मिळते, वनांच्या वाढीसाठी, पर्यावरण सुरक्षेसाठी आपण सर्वांनी जागृत राहिले पाहीजे.

२१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पर्यावरण, वने, जंगल, पर्यावरण सुरक्षा, वनांच्या वाढीसाठी वृक्षारोपण करणे, वृक्षांची जोपासना करणे, अवैध जंगलतोडीस अळा घालणे, जमिनीवरील अतिक्रमण, वणवे रोखणे यासाठी समाजात जनजागृती करणे, शाळांमध्ये अभियान राबविणे, यासाठी लोकांचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी धामणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, मुख्याध्यापिका अनुराधा कथले, उपशिक्षीका विजया हिंगे, उज्वला केदारी, कविता कोठावळे, वनरक्षक पूजा पवार,वनरक्षक लोणी योगेश निघोट, वनसेवक दिलीप वाघ, रेस्कु टीम सदस्य कल्पेश बढेकर, आनंद वळसे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.