पुणे जिल्हा : मंचरच्या बाजारात विविध प्रकारचे आंबे दाखल

मंचर – सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरातही विविध जातीची दर्जेदार आंबे मंचर (ता.आंबेगाव) येथील बाजारात दाखल झाले असून यावेळी आंबे खाणाऱ्यांची चंगळ होणार असल्याचे आंबा फळांचे व्यवसायिक सतीश बेंडे पाटील यांनी सांगितले.

मंचर येथील फळ व्यावसायिक सतीश बेंडे पाटील यांच्या चार पिढ्यांपासून फळांचा व्यवसाय सुरू असून मल्हारराव बाबुराव कंपनी नावाने पुणे, मुंबई, मंचर परिसरात ते गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे देवगड, रत्नागिरी, दापोडी यासह विविध जातीचे दर्जेदार आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून प्रतवारीनुसार तीनशे रुपये ते दोन हजार रुपये आंब्याचे दर आहेत.

गतवर्षी यावेळेस प्रतवारीनुसार ७०० ते २५०० रुपये डझन या बाजार भावाने आब्याची विक्री होत होती. वादळ, वारा, पाऊस कमी प्रमाणात झाल्याने यावेळी आंबा पिकाचे नुकसान झाले नाही. त्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याने आंब्याची आवक वाढली आहे. यावर्षी आंबा खाणाऱ्याची चंगळ असून विविध जातीचे नैसर्गिकरित्या पिकवलेले दर्जेदार आंबे घेण्यासाठी मंचर येथील स्टॉलला भेट द्यावी, असे बेंडे पाटील म्हणाले. बेंडे पाटील यांचे मंचर परिसरात ५, पुण्यात पाच ते सात स्टॉल असून आंबा खाणाऱ्यांसाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दर्जेदार आंबा पाठवला जातो, असेही त्यांनी सांगितले.

 मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोकण परिसरात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने पुणे, मुंबई ,मंचर शहरासह इतर ठिकाणीही बाजारपेठेत कोकणच्या राजाची आवक वाढली आहे. मंचर येथील मल्हारराव बाबुराव कंपनीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या आंबा पिकवला जातो. केमिकल विरहीत आंबा येथे खात्रीशीर मिळत असल्याने ग्राहकाचा विश्वास वाढीस लागला आहे.
– सतीश बेंडे पाटील, आंबा विक्रेते, मंचर