पुणे जिल्हा : उजनी धरणातून विसर्ग सुरु

वर्षभराचे नियोजन कोलमडणार : केवळ 24 टक्‍के पाणीसाठा

पळसदेव/ वडापुरी – पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातील जलसाठा संथ गतीने वाढत सध्या धरणात केवळ 24 टक्‍के पाणीसाठा आहे. आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व औस बंधारा भरण्यासाठी उजनीतून सुमारे 5 टीएमसी पाणी नदीव्दारे सोडण्यात येणार आहे. धरणातील उपयुक्‍त पाणीसाठ्यापैकी हे पाच टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात येणार असल्याने पावसाने ओढ दिल्यास वर्षभरातील पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता बॅकवॉटरलगतचे शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

धरणातून नदीत पाणी सोडण्याचा निर्णय नदीलगतच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा असला, तरी बॅकवॉटर लगतच्या शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. राजकीय स्वार्थातून घेतलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त होऊन आगामी काळात सर्वांवर टंचाईची टांगती तलवार राहील, अशी प्रतिक्रिया बॅकवॉटरलगतचे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सध्या उजनीतील पाणीसाठा 76.41 टीएमसी म्हणजे 24 टक्‍क्‍यांवर गेला आहे. यामध्ये सुमारे 63 टीएमसी पाणीसाठा हा मृतसाठा आहे. उर्वरित 13 टीएमसी पाणी साठा उपयुक्‍त साठा आहे. या उपयुक्त पाणी साठ्यापैकी सुमारे 5 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात येणार आहे. उजनीत येणारा विसर्ग सध्या नगण्य आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची मागणी वाढली आहे. बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांचा तर जीव टांगणीला लागला आहे. उजनीच्या जीवावर अनेकांनी उसाची लागण केली आहे. जनावरांची चारापिके, फळबागा व पाणी पुरवठा योजना अवलंबून असलेल्या बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांचे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे डोळे लागले आहेत.

10 जुलैपर्यंत धरणातील मृत साठ्यातील सुमारे 19 टीएमसीहून अधिक पाण्याचा वापर झाल्याने धरण मायनस 36 टक्‍क्‍यांपर्यंत रिकामे झाले होते. यामध्ये संथगतीने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा प्लस 24 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. 2001, 2002, 2012, 2015, 2016 मध्ये धरणातील मृतसाठ्यातील पाणी वापरण्यात आले होते. यामध्ये सन 2016-17 मध्ये मायनस 59.72 टक्‍क्‍यांपर्यंत धरणातील पाणीसाठा खालावला होता.

नदी कोरड्या असल्याने विसर्ग
याबाबत उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर व नदीलगतच्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्याबाबत आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या आदेशाने पाणी सोडणार आहे. दोन दिवसांत विसर्गाचे नियोजन आहे. नदी कोरडी असल्याने पंढरपूर व औस बंधारा भरण्यासाठी पाच टीएमसीची गरज आहे.

बॅकवॉटरच्या कार्यक्षेत्रात धगधग
उजनीच्या बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या व धरणासाठी जमिनी दिलेल्या विस्थापितांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. उजनी धरणातून नदीत पाच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे व्होट बॅंकेचे तात्पुरते समाधान करण्याचा निर्णय आहे. धरणातील मृत पाणीसाठा धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद धरणनिर्मितीच्या काळात लिहिलेल्या धरणाच्या घटनेत आहे. मात्र, या घटनेची सर्रास पायमल्ली होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय नदीतून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे नदीतून पाणी सोडल्यास धरणग्रस्तांच्या माध्यमातून आंदोलन उभा राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.